दशसुत्री उमेद अभियानाची

दशसुत्री

अभियानाअंतर्गत तयार होणारे स्वयंसहाय्यता समूह हे दहा सूत्रांनुसार चालविले जातात.

यातील पहिल्या पाच सूत्रांचा समावेश हा धनव्यवहार मध्ये होतो.

  1. नियमित बैठक
  2. नियमित बचत
  3. नियमित अंतर्गत कर्ज व्यवहार
  4. नियमित कर्जाची परतफेड
  5. नियमित लेखे अद्ययावत ठेवणे

पुढील पाच सूत्रांचा समावेश हा मनव्यवहार मध्ये होतो.

  1. आरोग्य व स्वच्छता
  2. शिक्षण
  3. पंचायत संस्थांमध्ये सहभाग
  4. शासकीय योजनामध्ये सहभाग
  5. शाश्वत उपजीविका

आता आपण प्रत्येक सूत्रानुसार सविस्तर माहिती घेऊ..

१) नियमित बैठक :

स्वयंसहाय्यता समुहाची  बैठक ही दर आठवड्याला घेण्यात यावी. समूहाने  ठरविलेल्या तारखेला प्रत्येक वेळी वेगवेगळ्या सदस्यांच्या घरी एकानंतर एक बैठक आयोजित करावी.

२) नियमित बचत :

समूहाची बचत दर आठवड्याला सभेच्या दिवशी स्वतः उपस्थित राहूनच  भरावी. जितकी बचत रक्कम असेल ती पूर्णपणे देण्यात  द्यावी.

३) अंतर्गत कर्ज वितरण :

समूहाने बचतीची रक्कम बँकेत जमा न ठेवता ती रक्कम गटातील अत्यंत गरजू सदस्यांना त्यांच्या गरजांच्या प्राधान्यक्रमाने विचार  करून अंतर्गत कर्ज परतफेड म्हणून वितरीत करावी. समूहातील  जमा झालेली रक्कम व सभेच्या दिवशी होणारी मागणी रक्कम याचा मेळ घालण्यासाठी मागणीचा प्राधान्यक्रम निश्चित करावा.

४) कर्जाची नियमित परतफेड :

ज्यावेळी समूहातील महिला घेतलेले  कर्ज ठरवून दिलेल्या  सुलभ हप्त्यामध्ये परत करतील, त्यावेळी इतर सदस्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यास मदत होईल. कर्ज परतफेड केल्यामुळे त्यांची पत वाढेल. नियमित व्याजाची रक्कम जमा झाल्यामुळे गटाचा नफा वाढविण्यास मदत होते. त्यामुळे समूहाकडे अंतर्गत कर्ज व्यवहारासाठी उपलब्ध असलेली रक्कमही वाढत जाते. नियमित कर्ज परतफेड करणारा समूह भविष्यात मोठ्या कर्जासाठी अधिक योग्य समजला जातो.

५) गटाचे लेखे अद्ययावत ठेवणेः

स्वयंसहाय्यता समूहांच्या दैनंदिन व्यवहारांची (बचत, अंतर्गत कर्जव्यवहार, परतफेड, दंड इत्यादी) लेखी स्वरूपात बैठकीच्या दिवशीच सविस्तर  नोंद करणे म्हणजे अद्ययावत लेखे होय. लेखे हा गटाच्या व्यवहारांचा आरसा आहे. ज्याप्रमाणे आरसा स्वच्छ असेल तर त्यामध्ये दिसणारी प्रतिमा स्वच्छ दिसते, त्याचप्रमाणे स्वयं सहाय्यता समूहाचे लेखे अद्ययावत ठेवले की त्या समूहाचे आर्थिक व्यवहार चोख होतात याची माहिती होते.

६) नियमित आरोग्याची काळजी घेणेः

आपल्या ग्रामीण गरीब कुटुंबामध्ये आजारांवर खूप खर्च होत असते. अनेकदा गावांमध्ये चांगल्या आरोग्यसेवा उपलब्ध नसतात आणि खाजगी दवाखान्यामध्ये लागणारा खर्च करण्याची ऐपत नसल्यामुळे आजाराकडे दुर्लक्ष होते किंवा अंधश्रध्दांना बळी पडावे लागते. निरोगी राहिले तर हा खर्च वाचतो व एक प्रकारे पैशांची बचत होते. आरोग्य विषयक जाणीव जागृती शिबिरे, आरोग्यदिंडी व व्यसनमुक्ती व संदर्भसेवा इत्यादीबाबत गटाच्या बैठकीत नियमित चर्चा करण्यात यावी. शक्य असल्यास गटाची बैठकीची तारीख / वार निश्चित करून ANM, आशा वर्कर, MPW, आंगणवाडी सेविका, किंवा डॉक्टर्स यांना मार्गदर्शनास बोलवावे.

७) शिक्षण विषयक जागरूकता वाढविणे :

निरक्षरता व अज्ञान हे गरिबीचे एक प्रमुख कारण तसेच परिणाम आहे. खरेतर शिक्षण हाच गरिबी निर्मूलनाचा पाया आहे. गरीब कुटुंबामधील नवीन पिढी शिकली तर ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकेल. नोकरी वा व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना नियमित उत्पन्न सुरू होईल. शिक्षणामुळे शासकीय योजनांची माहिती होऊन ते त्याचा लाभ घेऊ शकतील. एकंदरीत शिक्षणाने त्यांना स्वतःला व त्यांच्या कुटुंबाला सन्मानाने जीवन जगण्यास मदत होईल.

८) पंचायतराज संस्थांबरोबर नियमित सहभागः

ग्रामपंचायत ही गावातील सर्वोच्च घटनात्मक संस्था आहे. त्यांच्या सोबतच्या नियमित सहभागाने महिलांचा तसेच गावाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. गटातील १००% सदस्यांचा सर्व वॉर्डसभा व महिला ग्रामसभा / ग्रामसभेत सक्रीय सहभाग असावा. याशिवाय, गटाने पंचायतराज संस्थांच्या उपक्रमांमध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदवावा तसेच गटाच्या उपक्रमांमध्ये पंचायतराज संस्थांना सहभागी करून घ्यावे.

९) शासकीय योजनांमध्ये नियमित सहभागः

गटातील प्रत्येक सदस्याने शासनाच्या किमान दोन योजनांमध्ये सक्रीय सहभाग नोंदवावा. याशिवाय, शासकीय योजनांचा लाभ उचित लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी पंचायतराज संस्थांच्या लाभार्थी निवड प्रक्रियेत सहभागी व्हावे.

१०) शाश्वत उपजीविकेसाठी उपाययोजनाः

सन्मानाने चांगले जीवन जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, चांगले आरोग्य व शिक्षण या किमान व मुलभूत गरजा पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी नियमित उत्पन्न आणि या उत्पन्नात नियमित वाढ होत जाणे तसेच खर्च भागवून भविष्यासाठी तरतूद करता येणे म्हणजेच आपले आजचे तसेच भविष्यातील जीवन सुरक्षित असणे यालाच शाश्वत उपजीविका म्हणतात. गटाने सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करून कुटुंबाची सध्याची उपजीविका बळकट करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. कुटुंबातील सदस्यांची गुण कौशल्ये लक्षात घेऊन त्यांना स्वयंरोजगार व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी गटामध्ये नियोजन करावे.

 

Share this:

Leave a comment