ग्रामसंघ म्हणजे काय ?

ग्रामसंघ  स्थापन करत  असताना सदस्याच्या मनामध्ये ग्रामसंघाची गरज का आहे? ग्रामसंघ का स्थापन करावा? त्यात कोण असणार ? असे बरेच प्रश्न तयार होतात.या लेखामध्ये आपण वरील सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करू.

ग्रामसंघ म्हणजे काय?

ग्रामसंघ

VO ग्रामसंघ हा आपल्याच गटांमधून तयार होणार आहे.आपणच सर्व महिला एकत्र येऊन तो तयार करणार आहोत.म्हणूनच भविष्यात ग्रामसंघ आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे.

ग्रामसंघाचे महत्व काय?

‘उमेद’ अभियानाचा उद्देश गरिबातील गरीब आणि जोखीम प्रवण महिलांना गटाच्या माध्यमातून आर्थिक आणि सामाजिक समावेशन करणे असा आहे.आपल्या भागात एकल,विधवा,वृद्ध महिला आहेत.वर्षातून चार पाच महिने स्थलांतर करणारी कुटुंबे आहेत.त्यांचे प्रश्न वेगेळे आहेत.काही वेळेस त्यांना गटामध्ये सामील करणे सुद्धा अवघड असते.मात्र म्हणून आपण त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू शकत नाही.मग अशा स्त्रियांना किंवा कटुंबाना अभियानातून मदत करण्यासाठी गावामध्ये ग्रामसंघासारखे एक व्यापक संघटन हवे.अशा समस्या आल्या तर ग्रामसंघ गटाबाहेरील व्यक्तींनाही मदत करू शकतो.

ग्रामसंघ स्थापन होण्यासाठी किमान किती गट असावे लागतात ?

ग्रामसंघ स्थापन होताना किमान पाच गटांची आवश्यकता असते.एका ग्रामसंघामध्ये कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त पंचवीस गट असतात.जर गाव खूप लहान असेल आणि ग्रामसंघ स्थापन करताना पाच गट नसतील तर शेजारील गावातील पात्र असणार्या गटांचा समावेश करून ग्रामसंघ स्थापन करता येऊ शकतो.

कोणत्या गटांचा ग्रामसंघामध्ये समावेश होऊ शकतो?

ग्रामसंघ स्थापन होताना उमेद अभियानातील दशसूत्री पाळणारे समूह असावेत.त्या समूहांना किमान ६ महिने पूर्ण झालेले असावेत. त्या समूहांना फिरता निधी मिळालेला असावा त्याचबरोबर या समूहांचे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण ( SM2 ) झालेले असावे.या गोष्टी पूर्ण असणारे समूह ग्रामसंघामध्ये समावेश करू शकतात.

हे समूह गावातील गरीब महिलांचे असावेत.गावातील गरीब महिलांचे समूह असणे याचा अर्थ फक्त दारिद्र्य रेषेखालील महिलांचा समूह असणे असा होत नाही.

ज्या गावची लोकसंख्या अंदाजे १००० ते ३००० आहे तिथे जास्तीत जास्त १० ते ३० पर्यंत समूह स्थापना होऊ शकतील असा अंदाज आहे अशा ठिकाणी गावात एकच ग्रामसंघ करावा.

ज्या गावात अंदाजे ३००० ते ५००० लोकसंख्या आहे अशा गावात गटांची संख्या वाढेल त्यामुळे अशा गावात एकापेक्षा जास्त ग्रामसंघ होतील.

भौगोलिक दृष्ट्या आव्हानात्मक परिस्थिती असलेल्या भागात तेथील सोयीनुसार ग्रामसंघ तयार करावेत.काही ठिकाणी गावच्या वाड्या/ वस्त्या/पाडे खूप लांब लांब अंतरावर असतात.अशा ठिकाणी गावची  लोकसंख्या कमी असली तरीही महिलांना लांब अंतरामुळे ग्रामसंघाच्या बैठकीसाठी एकत्र जमणे अवघड होऊ शकते.अशा वेळेस परिस्थितीनुसार आणि सोयीनुसार गरज पडल्यास एकापेक्षा जास्त ग्रामसंघ करावेत.

ग्रामसंघाची रचना कशी असते?

ग्रामसंघ

सर्वसाधारण सभा-

ग्रामसंघात सामील असणार्या प्रत्येक समूहातील प्रत्येक महिला हि ग्रामसंघाच्या सर्वसाधारण समितीची सदस्य असते.या सभेची बैठक दर तीन महिन्यांनी म्हणजेच वर्षातून चार वेळेस घेतली जाते.मात्र गरज पडल्यास कधीही बैठक घेता येते.

कार्यकारी समिती-

ग्रामसंघामध्ये सामील असणार्या प्रत्येक समूहाचे अध्यक्ष व सचिव मिळून कार्यकारी समिती होते.या समितीची बैठक दर महिन्याला होते.

पदाधिकारी-

ग्रामसंघाच्या कार्यकारी समिती मधून संघाचे एकूण तीन पदाधिकारी निवडले जातात.अध्यक्ष ,सचिव व कोषाध्यक्ष.

उपसमित्या-

ग्रामसंघाच्या विविध जबाबदार्या सुरळीत पार पडाव्यात यासाठी विविध उपसमित्या असतात.कार्यकारी समितीचे सदस्य या उपसमित्यांमध्ये सदस्य असतात.संपादणूक समिती वगळता ग्रामसंघाचे पदाधिकारी इतर कोणत्याही समितीचे सदस्य नसतात.

ग्रामसंघाच्या चार कायमस्वरूपी उपसमित्या असतात तर काही समित्या तात्पुरत्या गरजेनुसार तयार होतात.उदा: संपादणूक समिती,आरोग्य समिती…..इ.

कायमस्वरूपी असणार्या समित्या पुढीलप्रमाणे-

१)गट मूल्यमापन समिती

२)बँक जोडणी समिती

३)सूक्ष्म नियोजन आराखडा मुल्यांकन/उपजीविका समिती

४)सामाजिक समस्या मुल्यांकन समिती

कार्यकारी समिती,उपसमित्या आणि ग्रामसंघाचे पदाधिकारी यांचा कार्यकाल दोन वर्षांचा असतो.त्यानंतर यातील २/३ सदस्य बदलले जातात.मात्र दोन वर्षाच्या आतही काही कारणास्तव यांचे पद जाऊ शकते.

सर्वसाधारण सभेच्या बैठका कधी होतात?

दर ३ महिन्यांनी एक याप्रमाणे सर्वसाधारण सभेच्या वर्षातून एकूण चार बैठका होतात.त्यातील शेवटची बैठक म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा.

या बैठकीच्या आधी दहा दिवस सर्व सदस्यांना बैठकीची तारीख,वार,वेळ,ठिकाण आणि बैठकीचे विषय याबाबत ग्रामसंघाकडून लेखी सूचना पाठवली जाते.

या बैठकीसाठी एकूण सदस्यांपैकी २/३ सदस्यांची उपस्थिती गणपूर्ती म्हणून आवश्यक असते.

या बैठकीचे कामकाज ग्रामसंघाचे पदाधिकारी बघतात.

या बैठकीत प्रथम ग्रामसंघाच्या आतापर्यंत च्या कामाचा आढावा घेतला जातो. ग्रामसंघाचे काम, ग्रामसंघाने मधल्या काळात घेतलेले निर्णय यावर चर्चा होते.

यानंतर आधीची सभा आणि आत्ताची सभा याच्या दरम्यान ग्रामसंघाने काही निर्णय घेतेले असतील तर त्याला मान्यता घेतली जाते.तसेच इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा होते.

कार्यकारी समितीच्या बैठका केव्हा होतात?

कार्यकारी मंडळाची बैठक महिन्यातून एकदा होते.हीच ग्रामसंघाची बैठक होय.मात्र आवश्यकता असल्यास महिन्यामध्ये एकापेक्षा जास्त बैठका घेता येतात.

बैठकीचा दिनांक,वेळ आणि स्थळ हे सर्व कार्यकारी मंडळ सदस्यांच्या सहमतीने निश्चित केले जाते.त्यामध्ये काही बदल असल्यास तो सर्व सदस्यांना किमान ७ दिवस आधी कळविण्यात येतो.२/३ सदस्यांनी लेखी मागणी केल्यास ७ दिवसांची सूचना देऊन विशेष बैठकीचे नियोजन करता येते.

कार्यकारी समिती बैठकीमध्ये गणपूर्ती साठी एकूण सदस्यांपैकी २/३ सदस्यांची उपस्थिती आवश्यक राहील.

सर्वसाधारण सभेमधील निर्णयांची अंमलबजावणी करणे हि कार्यकारी समितीची जबाबदारी आहे.

कार्यकारी समिती मार्फत ग्रामसंघातील सदस्य गटाच्या कामाचे मुल्यांकन करून गटांना मार्गदर्शन केले जाते

ग्रामसंघामध्ये नवीन गटांना प्रवेश देणे किंवा आवश्यकता असल्यास काही गटांचे सदस्यत्व रद्द केले जाते.

आर्थिक व्यवहार,लेखे,अंदाजपत्रक आणि कार्यक्रमाचा आढावा तसेच मुल्यांकन केले जाते.

ग्रामसंघाला अभियानातून मिळणारा विविध निधी तसेच गटांकडून येणारी सभासद फी,भागभांडवल आणि व्याज यातून ग्रामसंघाचा निधी उभा राहणार आहे.या पैशाचा हिशोब ठेवणे,वंचित घटकांसाठी असलेल्या निधीमधून पात्र व्यक्ती किंवा कुटुंब शोधणे आणि त्यांना मदत करणे,उपलब्ध निधी नव्या गटांमध्ये फिरवत राहणे हे कार्यकारी समितीचे कर्तव्य असेल.

गटांच्या किंवा ग्रामसंघाच्या कामाच्या संबंधात तक्रारींची दखल घेणे व त्यावर तोडगा काढणे ही सर्व कामे  कार्यकारी समिती मार्फत केली जातात.

ग्रामसंघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड कशी होते?

ग्रामसंघाच्या पहिल्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते.यामध्ये अध्यक्ष,सचिव,कोषाध्यक्ष यांची निवड करायची असते. ग्रामसंघातील कार्यकारी समिती मधून या पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते.ही निवड सर्वानुमते मतदान पद्धतीने केली जाते.

ग्रामसंघ पदाधिकारी यांच्या भूमिका व जबाबदार्या कोणत्या?

अध्यक्ष:

१)सर्वसाधारण सभा,विशेष सर्वसाधारण सभेचे अध्यक्षस्थान भूषविणे.

२) ग्रामसंघाच्या सर्व बैठकांचे अध्यक्षस्थान भूषविणे.

३) ग्रामसंघाच्या घेणे-देणे व्यवहारावर सह्या करणे.

४)कार्यकारी मंडळात एखाद्या विषयावर समसमान मतदान झाल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार अध्यक्षाकडे असतो.

५)भविष्यात निर्माण होणार्या प्रभाग पातळीवरील प्रभागसंघाच्या बैठकीत आपल्या ग्रामसंघाचे प्रतिनिधित्व करणे.

सचिव:

  • अध्यक्षांच्या अनुपस्थित बैठकीचे अध्यक्षपद भूषविणे.
  • ग्रामसंघाच्या बैठकीत होणार्या आर्थिक व्यवहारांची व इतर विषयांवरील होणार्या चर्चेची नोंद सभेमध्येच करून त्यावर सर्व सदस्यांची सही घेणे.
  • ग्रामसंघाचा पत्रव्यवहार पाहणे.
  • कार्यकारी समितीच्या ठरावानुसार, ग्रामसंघाच्या कर्मचार्यांना नेमणूकपत्र,निलंबन पत्र आणि सेवा मुक्तीचे पत्र देणे.
  • अध्यक्षांच्या अनुपस्थित प्रभाग पातळीवर प्रभागसंघाच्या बैठकीस हजर राहणे.

कोषाध्यक्ष:

  • ग्रामसंघाच्या सर्व आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे.
  • ग्रामसंघाला मिळालेल्या रकमेचा स्वीकार करणे आणि पोहोच पावतीवर सह्या करणे.देय असलेली रक्कम अदा करणे.चेकवर सह्या करणे.
  • ग्रामसंघाचे हिशोब व्यवस्थित ठेवणे.आर्थिक व्यवहारांचे मूल्यमापन करून त्यावर सह्या करून ते सचिवांना पडताळणी साठी सदर करणे.
  • ग्रामसंघाचा निधी वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे.
  • ग्रामसंघाचा हिशोब ताळेबंद करून घेणे आणि ग्रामसंघाच्या बैठकीत सर्वांना सांगणे.

ग्रामसंघ लिपिका:

  • ग्रामसंघाच्या बैठकीच्या दिवशी २० मिनिटे आधी पोहोचून बैठकीचा अजेंडा आणि नियोजन तयार करणे.
  • ग्रामसंघाच्या बैठकीमध्ये आवश्यक तिथे समूहांना मार्गदर्शन करून सर्व गटातील सदस्यांच्या उपस्थिती ची खात्री करून घेणे.
  • ग्रामसंघाच्या बैठकीमध्ये गटांच्या कामकाजाचा आढावा घेणे व गटाचे अंतर्गत व्यवहार व परतफेडीचे नियोजन करून देणे.
  • ग्रामसंघाची सर्व पुस्तके बैठकीमध्ये लिहून त्यांचे सर्व हिशोब चोख ठेवणे.
  • ग्रामसंघाकडे सादर केलेल्या MIP चा अभ्यास करून गटांना कर्ज देणे व ठरलेल्या हप्त्यानुसार परतफेड विहित मुदतीत गटांकडून गोळा करणे.
  • समितीमधील सदस्यांनी केलेल्या कामाचा अहवाल तयार करणे.

ग्रामसंघाच्या उपसमित्यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या-

गट मूल्यमापन समिती-

ग्रामसंघात सामील असणाऱ्या समूहाचे कामकाज सुरळीत चालते का हे पाहणे तसेच गावातील उरलेल्या गरीब,अतिगरीब वंचित आणि जोखीम प्रवर्ण कुटुंबांचे सामावेशन हि या समितीची प्रमुख जबाबदारी आहे.

बँक जोडणी समिती-

पात्र समूहांना बँकेकडून गरजेनुसार व वेळेत कर्जपुरवठा होण्यासाठी मदत करणे हि या समितीची मुख्य जबाबदारी आहे.सूक्ष्म गुंतवणूक निधी ( CIF ) किंवा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेड होते का याचा पाठपुरवठा करणे आणि त्याचा अहवाल ग्रामसंघापुढे सादर करणे.

सूक्ष्म नियोजन आराखडा मुल्यांकन आणि उपजीविका समिती-

ग्रामसंघात सामील असलेल्या प्रत्येक पात्र समूहाचा सूक्ष्म नियोजन आराखडा तयार झाला का हे तपासणे.या निधीअंतर्गत मिळालेल्या कर्जाचा वापर पूर्णपणे ठरवलेल्या कामासाठी केला जातो का हे पाहणे.ज्या व्यवसायासाठी कर्ज घेतले आहे त्याला विमा संरक्षण मिळाले आहे का याची खात्री करणे.

सामाजिक समस्या मुल्यांकन समिती-

ग्रामसंघात सामील असणाऱ्या समूहांच्या माध्यमातून महिलांना भेडसावणाऱ्या विविध समस्या समजून घेणे.ग्रामपंचायत,गावातील इतर सरकारी यंत्रणा यांच्यासोबत गावातील सामाजिक समस्यांबाबत चर्चा करणे.तसेच विविध सरकारी योजनाची माहिती घेऊन ती समूहांपर्यंत पोहोचवणे.गावातील समस्या सोडविण्यासाठी जास्तीत जास्त महिला ग्रामसभेत म्हणजेच गावच्या कारभारात सहभागी होतील यासाठी त्यांची तयारी करून घेणे.

संपादणूक समिती-

समूहातील महिलांच्या गरजेनुसार व ग्रामसंघासाठी लागणाऱ्या वस्तूंची,कामांची व सेवांची एकत्रित खरेदी हे या समितीचे मुख्य काम आहे.हि आवश्यकतेनुसार तयार होते.संपादणूक समिती चा कार्यकाल २ वर्षांचा असतो.या समिती मध्ये किमान पाच सदस्य असतात.ग्रामसंघाचे अध्यक्ष हे या समितीचे अध्यक्ष असतात.ग्रामसंघाचे सचिव हे या समितीचे सदस्य सचिव असतात तर कार्यकारी समिती ने नियुक्त केलेले तीन सदस्य हे या समितीत सदस्य असतात.

 

 

Share this:
Contents hide
1 ग्रामसंघ म्हणजे काय?

Leave a comment