बचत गट आणि स्वयंसहाय्यता समूह यातील फरक काय ?

आजच्या लेखामध्ये आपण बचत गट आणि स्वयंसहाय्यता समूह या दोन गोष्टींमधील फरक समजून घेणार आहोत.

आपण नेहमी पाहत असतो कि पैशांची बचत करण्यासाठी महिला एकत्रित येतात त्यांना आपण बचत गट किंवा बिशी या नावाने ओळखतो पण महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अंतर्गत जे बचत गट तयार झालेले असतात त्यांना स्वयंसहाय्यता समूह असे संबोधले जाते. आता स्वयंसहाय्यता समूह हाच शब्द का वापरला गेला असेल याचे उत्तर पाहण्यासाठी आपण  दोन्ही गटांमधील फरक समजून घेऊ.

SHG MEETING UMED,उमेद अभियान समूहाची बैठक

बचत गटाच्या  माध्यमातून केवळ बचतीपुरत्याच  महिला एकत्रित येतात परंतु स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून महिला स्व-सहाय्यासाठी संघटित होतात.

बचत गटामध्ये बचत आणि कर्ज यांची किती देवाण-घेवाण झाली याच्या चर्चा होतील परंतु स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून महिला स्वतःच्या प्रश्नांबाबत चर्चा करतात.

बचत गटामध्ये बचत हेच केवळ एकत्रित येण्याचे केंद्रबिंदू असेल परंतु स्वयंसहाय्यता समूहामध्ये अनेक माध्यमांपैकी बचत हे एक एकत्रित येण्याचे माध्यम असते.

बचत गटामध्ये महिला जीवनाच्या सर्वांगीण पैलूंबाबत स्वतःचा निर्णय स्वतः घेतीलच असे नाही परंतु स्वयंसहाय्यता समूहामध्ये महिला जीवनाच्या सर्वांगीण पैलूंबाबत (साक्षरता, मुलामुलींची शाळा, सकस आहार, स्वतःच मुल, आरोग्य, हक्काची जाणीव, आर्थिक मालकी हक्क, कौटुंबिक अन्याय नाकारणे, बालविवाह विरोध, अंधश्रद्धा विरोध, विमा) स्वतःचा निर्णय स्वतः घेतात.

बचत गटामध्ये महिलांमध्ये एक भावनिक बंध, आपलेपणाची जाणीव निर्माण होईलच असे नाही परंतु स्वयंसहाय्यता समूहातील महिलांमध्ये एक भावनिक बंध निर्माण होतात आपलेपणाची जाणीव निर्माण होते.

बचत गटामध्ये महिलांमधील संवाद बचतीच्या भोवतीने मर्यादित असतो परंतु स्वयंसहाय्यता समूहातील महिलांमध्ये सुसंवाद वाढून एकीचे बळ निर्माण होते.

बचत गटामध्ये केवळ बचतीपुरता विचार करण्याची वृत्ती निर्माण होते परंतु स्वयंसहाय्यता समूहामध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण होते.

बचत गटामध्ये पैसा वापरल्यास वाढतो हे स्पष्ट होईल परंतु स्वयंसहाय्यता समूहामध्ये  पैसा वापरल्यास वाढतो, पण वाढलेल्या पैशाचे सुनियोजन कसे करावे याचे ज्ञान, कौशल्य वाढते आणि योग्य दृष्टीकोन वाढीस लागतो.

Share this:

Leave a comment